रंग माझा वेगळा !
नमस्कार मंडळी ! मी अदिती..! अदिती अभिजीत प्रभू. इयत्ता सातवी. Nice to meet you. खरं तर हे nice to meet you हे का म्हणतात ते काही मला माहित नाही. कारण, तुम्हाला भेटून मला काही "nice" वगैरे वाटत नाही. म्हणजे वाईट सुद्धा वाटत नाही. खरं तर काहीच वाटत नाही. तरी आई म्हणते की असं म्हणायचं असतं. आणि आता सवयच लागली आहे. असो. ..
आत्ताच झोपून उठले आहे. म्हणून माझा "best mood" नाहीये. तशी मला लवकर उठायची सवय आहे. पण उठल्या उठल्या फार बोलावं असं वाटत नाही. याचा अर्थ असा नाही की मी बोलकी आहे. बर्याच वेळा तर मला बोलायला काहीच सुचत नाही. किंवा आई बाबा, दादा, मित्र मैत्रिणी, जे बोलतात ते कळतं, किंवा कळलच तर रुचतं असं काही नाही.
बरं, आत्तापर्यंत तुम्हाला कळलच असेल की आमची छोटीशी family आहे - आई बाबा, दादा आणि मी. आई खूपच प्रेमळ आहे. मला खूप समजून घेते. कोणाहीसमोर माझीच बाजू घेते. माझ्यासाठी भांडते, माझे लाड तर करतेच, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे, माझ्यामुळे खूप सहन करते. बाबाही खूप प्रेमळ आहेत. पण "मर्दानगी" का काय ते दाखवण्यामागे strict असण्याचा आव आणतात. ते काही असे माझे मित्र वगैरे नाहीत. पण मला समजून घेण्याचा प्रयत्न मात्र करताना दिसतात. आणि दादा - त्याच्या बद्दल सांगायचं तर सगळी गम्मतच आहे. बहुतेक वेळा तर तो माझ्यावर चिडलेलाच असतो. सारखा ओरडतो किंवा भांडतो. पण कोणी बाहेरचं मला काही चुकीचं बोललं, तर मात्र तो जराही सहन करत नाही. खूप मजा येते दादा बरोबर. त्याला पाहून मी अनेक गोष्टी शिकले आहे आजवर. म्हणजे तो idol का काय म्हणतात ना, तसा आहे माझा.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, की सारखा मी "मला समजून" घेण्यावर भर का देते आहे ? गैर समज करून घेऊ नका, मी अजिबात स्वार्थी वगैरे नाही. किंवा सगळ्यांनी मलाच समजून घेणं हे त्याचं कर्तव्य आहे असंही अजिबात नाही. पण मला समजणं तसं कठीणच आहे. तुम्ही पहिल्यांदा मला भेटलात, की तुमच्या लक्षात येईल कदाचित. तुम्हाला बघितल्यावर मी तुमच्याकडे बघेनच असं नाही. याचा अर्थ असा नाही की मी तुम्हाला बघितलच नाही आहे. किंवा तुमच्याकडे दुर्लक्ष करते आहे. माझं तुमच्याकडे पूर्ण लक्ष आहे. फक्त तुमच्या डोळ्यात बघणं माझ्या साठी खूप stressful आहे. सुरवातीला आई बाबा नेहेमी म्हणायचे "अगं त्यांच्या कडे बघून बोल - ते तुझ्याशी बोलताहेत". दामले काका तर माझ्या बाबांना सरळ म्हणाले होते "खूप लाडावलं आहे तुम्ही अदुला. इतका माज की साधं मोठ्यांकडे बघणंसुद्धा हिला त्रासाचं वाटतं. पण माझ्यावर विश्वास ठेवा. या पैकी काही एक खरं नाही आहे. इतर लोक जे तुमच्या डोळ्यात बघून मान हलवतात, ऐकण्याचा आव आणतात, त्यांच्या पेक्षा, मी तुमच्या कडे जास्त लक्ष देऊन ऐकत असते. फक्त मी तुमच्याकडे बघत नाहीये म्हणून असं समजू नका की माझं लक्ष नाहीये.
ही एक गोष्टं झाली. अजून एका गोष्टीत गैरसमज होत असतात. ती म्हणजे मला reading between the lines जमत नाही म्हणे. म्हणजे, परवाच शेजारच्या Ruby Aunty घरी आल्या होत्या. Ruby Aunty फक्त english मध्येच बोलतात. त्या आईशी गप्पा मारत असताना, मी स्वयंपाकघरात गेले, आणि एक डबा उघडायचा प्रयत्न करत होते. आता माझ्या हातातली आणि बोटातली शक्ती थोडी कमी आहे. त्यांनी ते पाहिलं आणि मला म्हणाल्या, “Dont worry baby, I will help you.“ मला भयंकर राग आला आणि insulting वाटलं. मी १३ वर्षांची आहे, म्हणजेच teenager. आणि त्या मला baby म्हणाल्या. मी सरळ त्यांना म्हणाले: “Ruby Aunty, I am no Baby.. Why did you call me one??” त्या म्हणाल्या, I just called you baby with love, why did you take it so literally ?. मी रागाने निघून गेले. थोड्या वेळाने आई माझ्या जवळ आली आणि मला म्हणाली, मला कळतंय की तू प्रत्येक गोष्ट खूप शब्दशः घेतेस, पण बर्याच वेळा, लोकांना तसं म्हणायचं नसतं, उदाहरणार्थ, आपण जेव्हा म्हणतो “पालथ्या घड्यावर पाणी”, त्याचा अर्थ खरच पालथ्या घड्यावर पाणी टाकणं नसून, माझे सगळे प्रयत्न निरुपयोगी ठरले असा आहे. हो की नाही ? त्यामुळे असं मनाला लावून घेऊ नकोस गं. लोकं तुला समजून घेऊ शकत नाहीयेत, तर तू तरी त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करशील का ?
ही गोष्टं काही मला कळत नव्हती. जे बोलायचं आहे, ते जर म्हणायचं नाहीये, तर ते बोलावंच का ? इतके complicated का असतात सगळे ? अशाने भाषेला अर्थच काय ? त्यापेक्षा सगळं असं थेट सांगणं काय वाईट आहे ? किती सोपं होऊन जाईल सगळं. असो, हे सगळं माझ्या समजण्या पलीकडे आहे आणि म्हणूनच आई बाबांना त्याचा त्रास होतो. माझ्या मैत्रिणी तर मला “ तुला गम्मत कळतच नाही, असं म्हणतात”.
आता आहे मी वेगळी, इतरांपेक्षा खूप वेगळी. आनंद झाला की मी नं रहावता हात झटकते. दादा म्हणतो, की ते खूप विचित्र दिसतं. पण मला ते कसं थांबवायचं ते कळत नाही. Routine मध्ये अचानक बदल झाला, तर मला त्रास होतो. मला advance planning आवडतं. लोकांशी बोलायला तर आवडतं, पण नक्की कसं बोलायचं की लोकं दुखावली जाणार नाहीत, हे कळत नाही. कारण मला खोटं बोलता येत नाही. लोकांवर पटकन विश्वास ठेवते, आणि कुणी थोडी माया दाखवली की त्यांना आपलंसं मानते.
असो, खूप बोलले मी. आई हाका मारते आहे केव्हापासून. मला गेलं पाहिजे, नाहीतर शाळेला उशीर होईल. बर, एवढं सगळं बोलताना, एक गोष्टं सांगायची राहूनच गेली. मला ते काय म्हणतात त्याला Aspergers syndrome आहे. तुमच्यापैकी बर्याच लोकांना आता हुश्श... झालं असेल. की या सगळ्या विचित्रपणाला काही तरी नाव आहे हे ऐकून. मला या आजाराने त्रास होतो का ?
सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा आजार नाही. जसे अनेकविध स्वभाव, तश्याच अनेकविध learning styles. माझी learning आणि understanding style तुमच्या पेक्षा वेगळी आहे. पण खूश आहे मी. माझ्या कुणाहीविषयी तक्रारी नाहीत. आता, लोकांच्या ज्या माझ्याविषयी तक्रारी आहेत, त्या समजून घेण्याचा प्रयत्न चालू आहे, आणि चालू राहीलच. जायच्या आधी फक्त मी एक request करू का ?
माझ्या सारखी अनेक मुलं जगात आहेत. जी वेगळी मानली जातात. ती मुलं गोष्टी समजतात. पण तुमच्या पेक्षा वेगळ्या पद्धतीने. अशी मुलं मंदबुद्धी वगरे अजिबात नाहीत ! त्यांच्याविषयी वाईट बोललात की ती ही तितकीच दुखावतात. अशा मुलांना, तुम्ही तुमच्या जगात fit करण्याचा प्रयत्न न करता, फक्त आहेत तसे accept कराल का ? जमेल का हे छोटंसं काम? चला येते मी आता ! पुढच्या सम्मेलनाला भेटूच ! तोपर्यंत tata bye bye !
खूपच छान......
ReplyDelete