रंग माझा वेगळा !
नमस्कार मंडळी ! मी अदिती..! अदिती अभिजीत प्रभू. इयत्ता सातवी. Nice to meet you. खरं तर हे nice to meet you हे का म्हणतात ते काही मला माहित नाही. कारण, तुम्हाला भेटून मला काही "nice" वगैरे वाटत नाही. म्हणजे वाईट सुद्धा वाटत नाही. खरं तर काहीच वाटत नाही. तरी आई म्हणते की असं म्हणायचं असतं. आणि आता सवयच लागली आहे. असो. .. आत्ताच झोपून उठले आहे. म्हणून माझा "best mood" नाहीये. तशी मला लवकर उठायची सवय आहे. पण उठल्या उठल्या फार बोलावं असं वाटत नाही. याचा अर्थ असा नाही की मी बोलकी आहे. बर्याच वेळा तर मला बोलायला काहीच सुचत नाही. किंवा आई बाबा, दादा, मित्र मैत्रिणी, जे बोलतात ते कळतं, किंवा कळलच तर रुचतं असं काही नाही. बरं, आत्तापर्यंत तुम्हाला कळलच असेल की आमची छोटीशी family आहे - आई बाबा, दादा आणि मी. आई खूपच प्रेमळ आहे. मला खूप समजून घेते. कोणाहीसमोर माझीच बाजू घेते. माझ्यासाठी भांडते, माझे लाड तर करतेच, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे, माझ्यामुळे खूप सहन करते. बाबाही खूप प्रेमळ आहेत. पण "मर्दानगी" का काय ते दाखवण्यामागे strict असण्याचा आव आणतात. ...